ओंकार कुलकर्णी, धाराशिव
आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. देशभरात नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. सगळीकडे देवीची पूजा, आरती, गरबा अशा जल्लोषात नवरात्रीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. देवीच्या मंदिरात तसेच घरोघरी घटस्थापना केली जाते.
नवरात्रीमध्ये 9 दिवस दुर्गा मातेच्या 9 रुपांची पूजा केली जाते. आज नवरात्रीचा पहिला दिवस असून नवदुर्गेच्या पहिल्या रुपाचे अर्थात देवी शैलपुत्रीची आज पूजा केली जाते. याच पार्श्वभूमीवर तुळजाभवानीच्या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.
तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपवून देवी सिंहासनावर विराजमान झाली आहे. राज्यासह देशभरातील लाखो भाविक तुळजापुरात दाखल होत आहेत. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
आई तुळजाभवानीच्या मंदिरात दुपारी बारा वाजता विधिवत घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार असून तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून नवरात्रोत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविक मोठ्या संख्येनं देवीच्या दर्शनासाठी दाखल होत आहे.